शेकडो एकर शेतजमीन गेली पाण्याखाली
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील खारआंबोली धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीच्या काठाला भगदाड पडले असून, 500 एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपायांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गुरुवारी सकाळपासून मुरुड शहरासह पंचक्रोशी भागात 120 मि.मी. तर एकूण 1701 पाऊस कोसळला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतांमध्येही तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. मुसळधार पाऊस पडल्याने खारअंबोली धरण ही ओव्हरफ्लो होऊन जोरदार प्रवाहाने नदीच्या दिशेने जात असताना नदीच्या काठाला भगदाड पडले आणि पाण्याचा प्रवाह आजूबाजूच्या परिसरातील 350 शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. वरच्या शेतात चार फूट, तर खालच्या भागात सहा फूट पाणी साधारण 500 एकर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नदीच्या कठड्याला भगदाड पडल्याने शेती पाण्याखाली गेली असून, 35 शेतकऱ्यांचं अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. तरी लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई ताबडतोब द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करणार आहोत.
मनोज कमाने, माजी सरपंच, शिवसेना उपतालुकाप्रमुख
पाणी ओसरले की ताबडतोब शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिले आहेत. नुकसान भरपाईकरिता शासनाकडून निधी मंजूर करुन शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल.
रोहन शिंदे, तहसीलदार