पोलिसांनी लावला चोऱ्यांचा छडा
| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहरातील वरसे, भुवनेश्वर व अष्टमी येथील गजबजलेल्या लोकवस्तीत मार्च 2026 रोजी एकाच दिवशी 6 ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता. या घटनेनंतर अक्षरशः पोलिसांची झोप उडाली होती. मात्र, रोहा पोलिसांनी अगदी शिताफिने या सर्व चोऱ्यांचा छडा लावला असून तिघांवर कारवाई केली आहे. तसेच, त्यांच्याकडून लाखो किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गतवर्षी 26 मार्च रोजी एकाच दिवशी रोहे शहरातील नेहरूनगर येथील 1 ब्लॉक, अष्टमी नाक्यारील नवीन वसाहतीतील 3 ब्लॉक तसेच भुवनेश्वर येथील चैतन्य अपार्टमेंटमधील 2 ब्लॉक अशा 6 ठिकाणी घरफोडीची घटना घडली होती. यावेळी जवळपास 6 लाखाहुन अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चारेट्यांनी पलायन केले होते. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरफोडी करण्यापूर्वी शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली आणि आपली मोहिम फत्ते केली. एकाच दिवशी 6 ठिकाणी झालेल्या या घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते. या घटनेनंतर रोहा पोलीस ठाण्यात राजेंद्र गुरव यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत संबंधित चोरट्यांना मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर 21 तोळे सोन्याचे दागिने संबधित महिला वर्गाच्या स्वाधीन करण्यात आले.
