रायगडात 79 एसटी कर्मचारी निलंबित

103 जणांना नोटीस
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यभरात सुरु असणारा एसटीचा संप दोन आठवडे झाले तरी संपायचे नाव घेत नाही. संप मिटायचा तर सोडाच, याउलट अधिकच चिघळत चालला आहे. रायगड जिल्ह्यातील आत्तापर्यंत 79 जणांना निलंबित करण्यात आले असून 103 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
एसटी सेवा ठप्प झाली असून रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाला आहे. सुरुवातीला एसटीचा संप एक-दोन दिवसानंतर मिटेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र संपकरी आणि राज्य शासन हे दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने हा विषय न्यायालयात गेल्याने आता हा संप चिघळणार याची खात्री झाली होती. मात्र संपकरी काही केल्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने हे संप मोडीत काढण्यासाठी शासनाने संपकरी कर्मचार्‍यांचे निलंबन करण्याची सुरुवात केली.
टप्प्याटप्प्याने केलेल्या निलंबनाचा आकडा आजमितीला रायगड जिल्ह्याचा 79 वर जाऊन ठेपला आहे. मात्र संपकरी कर्मचारी राज्य शासनाच्या या कारवाईला न घाबरता आणि न डगमगता आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने शासनाने दुसरा पर्याय म्हणजे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी परिवहन खात्याच्या खाजगी वाहनांना एसटीच्या दरात प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत, राज्य शासनाने तेथेही न थांबता कंत्राटी कामगारांकडे आपला मोर्चा वळवला आणि हजारो कंत्राटी कामगारांना ङ्गकारणे दाखवाफ नोटीस बजावण्यास सुरुवात केली.
रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमधील 103 कंत्राटी कर्मचार्‍यांना ङ्गकारणे दाखवाफ नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आम्हाला या नोटीस आल्या तरी आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून राज्यातील आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत आणि त्यामुळे आम्ही कामावर जात नाहीत असे या कंत्राटी कर्मचार्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी आणि राज्य शासन या दोघांमधील अडमुठेपणामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी प्रवाशांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

Exit mobile version