अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीत 88 टक्के मतदान

पेण, मुरूड, कर्जत साठी रविवारी मतदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना आज सुरुवात झाली. महाविकास आघाडीने आपले बहुसंख्य उमेदवार बिनविरोध निवडून आणून यापूर्वीच वर्चस्व मिळवले आहे. मात्र काही जागांवर शिंदे गट आणि भाजपने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने निवडणुकांचा सोपस्कार पार पाडत आहे. पहिल्या टप्प्यात अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 1493 पैकी 1321 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्के वारीनुसार 88 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात मुरूड, पेण आणि कर्जत तालुक्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागापैकी 7 बिनविरोध तर 11 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 6, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 3 तर हमाल/मापारी मतदार संघात महविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे. 29 एप्रिल रोजी सायंकाळी मतमोजणी करण्यात येणार असून त्याच वेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत रंग चढला आहे. जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वा आहेत. त्यापैकी आतापर्यंत महाड, रोहा, खालापूर, माणगाव, पनवेल या पाच तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर अलिबाग, पेण, कर्जत आणि मुरुड या तालुक्यातील चार समित्यांमध्ये काही जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अलिबागमध्ये 28 रोजी मतदान पार पडले. आता पेण, कर्जत आणि मुरुडमध्ये काही जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये 99 जागांसाठी 197 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 88 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. तर उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 101 उमेदवारांमध्ये निवडणूक घेण्यात येत आहे. अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासांठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11, ग्रामपंचायती मतदारसंघात 4, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी मतदान घेण्यात आले. तर हमाल/मापारी मतदार संघात बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे.

पेण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासांठी सर्वाधिक 38 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 21, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 9, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 6 तर हमाल/मापारी मतदार संघात एका जागेसाठी 2 उमेदवार उभे आहेत. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासांठी सर्वाधिक 25 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 16, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांवर बिनविरोध, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 4 तर हमाल/मापारी मतदार संघात एका जागेसाठी बिनविरोध. मुरुड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासांठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 8, तसेच व्यापारी/आडते आणि हमाल/मापारी या दोन्ही मतदार संघात यापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित जागांसाठी लढत होणार असून महाविकास आघाडी विरोधात शिंदे आणि भाजप यांच्यात निवडणूक रंगणार आहे. पेण, कर्जत आणि मुरुडमध्ये 30 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान आज सकाळी मतदान केंद्रावर शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, जिल्हा चिटणीस ॲड आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, चित्रा पाटील, सुमना पाटील आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Exit mobile version