उद्यापासून 9 नवे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

एक जुलैपासून बँक आणि टॅक्ससह अनेक नियमांमध्ये बदल होणार असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आयडीबीआय आणि एसबीआय बँकेतून पैसे काढणे, तसेच कार-दुचाकीची खरेदी करणेही महाग होणार आहे. यासह अन्य कोणते बदल होणार आहेत हे जाणून घेऊया.

एसबीआयने नियमांमध्ये केला बदल

1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आणि चेकबुकच्या वापरावर ग्राहकांना जास्ती पैसे द्यावे लागणार आहे. एटीएममधून महिन्यात चार वेळाच पैसे काढणे मोफत असणार आहे, यानंतर पैसे काढल्यास ग्राहकाला 15 रुपये आणि जीएसटी देखील द्यावा लागेल. तसेच चेकबुक घेण्यासाठी देखील जास्ती पैसे द्यावे लागणार आहेत.

प्रत्येक चेकसाठी 5 रुपये

आयडीबीआय बँकेने 1 जुलैपासून चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे. रोख रक्कम (होम आणि नॉन होम) जमा करण्यासाठी, विविध बचत खात्यांसाठी अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांकरिता दरमहा मोफत सुविधांची संख्या कमी करुन अनुक्रमे 7 आणि 10 वरून पाच करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना आता केवळ दर वर्षाला 20 पानांचं चेक बुक मोफत मिळेल. त्यानंतर ग्राहकांना प्रत्येक चेकसाठी 5 रुपये शुक्ल द्यावे लागणार आहे. यासह ज्युबिलीप्लस ज्येष्ठ नागरिक खातेदारांच्या खात्यात मासिक सरासरी शिल्लक 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर लॉकर भाड्यात कोणतीही सूट मिळणार नाही.

आयएफएससी कोड वापरावा लागणार

सिंडीकेट बँक कॅनरा बँकेमध्ये मर्ज झाली असून 1 जुलैपासून बँकेचे आयएफएससी कोड बदलण्यात येत आहे. त्यामुळे सिंडीकेट बँकेच्या ग्राहकांना आला बँकेच्या शाखेकडून नवीन आयएफएससी कोड घ्यावा लागणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमती

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्र सरकार एलपीडी सिलिंडरच्या किंमतींची घोषणा करते. गेल्या महिन्यात सरकारने 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत 122 रुपयांची घट होती. आताही 1 जुलैला नवीन किंमतींची घोषणा केली जाईल.

सोन्याला ओळखपत्र मिळणार

ज्या पद्धतीने सरकारने देशातील सर्व नागरिकांना आधार कार्ड दिले आहे, त्याच पद्धतीने 1 जुलैपासून सोन्याच्या दागिन्यांवर विशिष्ट यूआयडी टाकणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने चोरी झाले किंवा हरवले आणि ते वितळवून त्याची विट बनवली नाही तर त्याचा खरा मालक ओळखता येणार आहे.

गाड्यांची किंमत वाढणार

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने कार आणि दुचाकींच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकींच्या किंमती 3 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

टीडीएस भरावा लागणार

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसले तर लवकर भरा, कारण 1 जुलैपासून यावर दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. आयटीआर फाईल करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत असते, मात्र सरकारने ही मूदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

चालक परवान्यात बदल

1 जुलैपासून वाहन चालक परवान्यात बदल होणार असून आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त स्कूलमधून प्रशिक्षण आणि आवश्यक अटींचे पालन केल्यानंतर तुम्हाला लायसन्स मिळू शकते.

बँक बॅलन्सबाबत बदल

कोरोना काळामध्ये खात्यात किमान रक्कम ठेवण्याचा नियम शिथिल करण्यात आला होता. 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत हा नियम होता. याचा कालावधी संपल्याने आता बँक खात्यात किमान रक्कम नसल्यास बँक अतिरिक्त शुल्क आकारू शकते.

Exit mobile version