। मुंबई । प्रतिनिधी ।
आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक शॉक देणारी बातमी आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे या दर वाढीचा थेट फटका राज्यातील ग्राहकांना बसणार आहे.
कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला MERC यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा FAC वाढवला आहे. जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.
कोरोनातून सावरत असतानाच जनतेला वाढत्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता वीजेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आधीच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. नुकतेच गॅसचे दर देखील 50 रूपयांनी वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडलं आहे.
FAC म्हणजे इंधन समायोजन आकारात कशी वाढ झाली?
0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे
101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे
301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे
501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे