972 हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान
| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये बुधवारी सायंकाळपासून अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे पाणी शेतात साचल्याने 972 हेक्टर क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील अलिबागसह दहा तालुक्यांना त्याचा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यामध्ये सुमारे 95 हजार हेक्टर क्षेत्र भात पिक लागवडीखाली आहे. यंदा भात पिक चांगल्या पध्दतीने बहरल्याने शेतकरी सुखावून गेला होता. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भात कापणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 70 टक्के कापणीची कामे पुर्ण झाली होती. परंतु अचानक मंगळवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले.
एक ते दीड तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. भाताची उडवी पावसाच्या पाण्याने भिजू नये यासाठी त्यावर प्लास्टीक कापड टाकण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. अवकाळी पावसामुळे अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड परिसर, नागाव, रेवदंडा, रामराज त्याचबरोबरच दक्षिण रायगड भागात पाऊस अधिक पडल्याने शेतांमध्ये पाणी साचले. कापणी केलेल्या भाताची रोपे पाण्यात भिजल्याने भातशेतीचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी भिजलेली रोपे पुन्हा उन्हात सुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र बदलत्या या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसला.
जिल्ह्यातील महाड , कर्जत, पोलादपूर या तालुक्यात भातशेतीचे खुप नुकसान झाले. अलिबाग, रोहा, खालापूर, पेण, माणगाव, सुधागड या तालुक्यात कमी नुकसान झाल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. एकूण क्षेत्राच्या 33 टक्के पेक्षा अधिक 972 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र कमी आहे. त्यात जाचक अटींमुळे शेतकरी पिक विम्यांकडे जास्त लक्ष देत नाही. अशा या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारत येत नाही.
भातशेतीचे नुकसान झालेले क्षेत्र
तालुके – क्षेत्र
पोलादपूर -140 हेक्टर,
महाड -185 हेक्टर
कर्जत -350 हेक्टर
खालापूर – 72 हेक्टर
रोहा – 58 हेक्टर
श्रीवर्धन – 20 हेक्टर
पेण -38 हेक्टर
सुधागड (पाली) – 48 हेक्टर
माणगांव – 61 हेक्टर