| उरण | वार्ताहर |
गेली अनेक वर्षांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू होते. अखेर अभियंता दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेचीही बचत होणार आहे. जेएनपीटी व इतर बंदरातून मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यावर मात करण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दास्तान फाटा-जासई ते गव्हाणफाटा पर्यंत नेहमीच वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत होती. यामुळे प्रवाशांबरोबर वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागत होता. यावर मात करण्यासाठी जासई येथे उड्डाणपुलाची उभारणी सुरू होती. वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी दास्तानफाटा-जासई ते शिवमंदिर दरम्यान 1200 मीटर लांबीचा चौपदरी जासई उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. उड्डाणपूलाचे काम मागील आठ वर्षांपासून रखरखडत रखडत सुरू आहे. एकीकडचा मार्ग पूर्ण झाल्याने व दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवा निमित्ताने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. त्यामुळे शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.