ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील सम्राटनगर भागातील रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेकदा तक्रारी करून, विनंती अर्ज करूनदेखील नेरळ ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या या भूमिकेबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी असून, ग्रामपंचायतीविरुद्ध स्थानिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नेरळ गावातील सम्राटनगर येथील दलितमित्र पी.डी. गायकवाड चौक ते जी.एस.सदावर्ते चौक या भागातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेले कित्येक वर्षांपासून रस्ता नादुरुस्त असून, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या भागातील रस्ता योग्य स्थितीत नसल्यामुळे तिथे कचऱ्याचे साम्राज्य झाले असून, त्या भागात रस्त्यावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्याची माहिती घेण्यासाठी स्थानिक तरुण आकाश अरुण गवळे यांनी नेरळ ग्रामपंचायत कार्यलयात 10 ऑक्टोबर 2022 रोजी या रस्त्याची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. पण, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. दुसरीकडे गवळे यांना कर्जत पंचायत समितीकडून पुरविण्यात आलेल्या माहितीमध्ये नेरळची आर्थिक परिस्थिती बेताची असून, नेरळ ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नाही म्हणून सदरचा रस्ता होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. मग नेरळ ग्रामपंचायतीमधील अन्य भागात कोणत्या माध्यमातून विकासकामे सुरु आहेत, असा प्रश्न सम्राटनगरमधील जनता उपस्थित करीत आहेत.
नेरळ परिसरातील पाहणी केली असता इतर भागात रस्त्यांची कामे जोमात सुरू आहेत, मग इथल्याच रस्त्यासाठी ग्रामपंचायत निधी नसल्याचे कारण काय? थोडक्यात, ग्रामपंचायत जाणूनबुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप आकाश अरुण गवळे यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे आता तरी नेरळ ग्रामपंचायत पी.डी. गायकवाड चौक ते जी.एस. सदावर्ते चौक असा रस्ता करणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.