| उरण | प्रतिनिधी |
गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत कोणताही अडथळा होऊ नये, याकरीता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मार्गात बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या काळात अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय नवी मुंबई आयुक्तालयाने घेतला. या क्षेत्रातील अवजड वाहनांसाठी अंशतः सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
गुरुवारी (दि.28) अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन शुक्रवारी (दि.29) ईद-ए-मिलाद हा सण असल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पुर्णतः 1 वाजल्यापासून ते गणपती विसर्जन/मिरवणुक व ईद-ए-मिलादची मिरवणुक संपेपर्यंत बंदी राहील.
हे नियम जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागा तर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. सर्व वाहन मालक, चालक, एमटी यार्ड मालक व सी.एफ.एस मालक यांनी या वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालय नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.