शांतता समन्वय सभेत प्रशासनाचे आवाहन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाचा प्रादुर्भाव हा जरी कमी झाला असला तिसरी लाट येण्याची संभावना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने येणारे दहीहंडी, गणेशोत्सव हे सण कोरोनाच्या नियमांचे पालन करून, आरोग्य शिबीर आयोजित करून साजरे करा, असे आवाहन अलिबाग पोलीस, महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज दहीहंडी, गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने अलिबाग येथील हॉरिझोन सभागृहात पोलीस, महसूल, शांतता समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मोहल्ला कमिटी, पत्रकार यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक संपन्न झाली. या सभेत विजेबाबत आणि तालुक्यातील रस्त्यांबाबत प्रश्न सदस्यांनी मांडले. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून विजेचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन महावितरण अधिकार्यांनी दिले आहे. 30 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी, तर 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सण साजरा होत आहे. दोन्ही हिंदूंचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, यावर्षीही या सणावर कोरोनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सणाच्या अनुषंगाने सण नियमांच्या अधीन राहून साजरे करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सणांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पोलीस आणि तहसीलदार यांनी समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती. अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ, अलिबाग पोलीस निरीक्षक के.डी कोल्हे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, वरसोली ग्रामपंचायत सदस्य हर्षल नाईक यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता मोहल्ला समिती सदस्य, स्पीकर व्यावसायिक उपस्थित होते.
यावर्षी कोरोना संकट अजून असल्याने कोरोनाच्या नियमाचे पालन करून सण साजरे करा, सार्वजनिक गणेश मंडळांनी आरोग्य शिबीर आयोजित करा, गणरायाच्या आगमन, विसर्जन मिरवणुका टाळा, गणरायाचे विसर्जन हे ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सध्या महावितरणतर्फे वीज तोडणी जोरात होत असल्याने आणि अनेक ग्रामपंचायतींच्या रस्त्यावरील वीज कापल्या असल्याने त्या त्वरित सुरू कराव्यात, लाऊड स्पीकर व्यावसायिकांना परवानगी द्यावी, तालुक्यातील खड्डेमय रस्त्याची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी सदस्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. याबाबत रीतसर परवानगी पोलीस आणि महसूल प्रशासनाची घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.