आपटा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मृत्यूपंथाला; आरोग्य अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी
। रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना प्रादुर्भाव काळात आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका मोडकळीस व नादुरुस्त असल्याने परिसरातील गर्भवती स्त्रियांना तसेच येथील आदिवासी रुग्ण व इतर समाजातील रुग्णांना अनेक वेळा खासगी वाहन व इतर भाडेतत्वावर वाहनाचा वापर करावा लागतो. केलवणे जि.प. गटात 33 आदिवासी वाड्या व 20 ते 22 गावांचा समावेश होतो. त्यांना खासगी रुग्णवाहिकांचा आधार घेणे परवडत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
पंचायत समिती व केलवणे पंचायत समितीचा त्यामध्ये समाविष्ट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्यांचा अभाव असल्याने गरोदर स्त्री तसेच प्रथमोपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना रात्री अपरात्री त्रास सहन करावा लागत आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णवाहिकेचा चालक वारंवार गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय होते.
आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका क्रमांक एमएच 06 के 9866 ही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने दरवेळी 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली जाते. त्यासाठी खूप वेळ वाया जात असल्याने रुग्णांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे.
याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी रायगड यांच्याशी व्यवहार करून नवीन रुग्णवाहिकेची मागणी केली आहे. परंतु त्यांनी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले असून मुदत संपलेली रुग्णवाहिका सातत्याने चालू ठेवत त्याच खराब झालेल्या रुग्णवाहिकेत गरोदर स्त्रियांना रुग्णांस सेवा पुरविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आपटा येथील रुग्णवाहिकेचा मुदत कालावधी संपून गेला आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेची तपासणी करून जबाबदार अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवासेना अधिकारी स्वप्निल भुवड याने रसायनी पोलिस ठाण्यात दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.