| खोपोली | वार्ताहर |
सहज सेवा फाऊंडेशनने खोपोलीत 2016 पासून मनोरुग्ण स्वच्छता उपक्रम हाती घेतला आहे. खोपोलीत विविध मार्गाने अनेक मनोरुग्ण दाखल होत असतात. परंतु सहज सेवा फाऊंडेशनने राबविलेल्या मनोरुग्ण स्वच्छता मोहिमेमुळे अनेकांना आपले हरवलेले कुटुंबीय परत मिळण्यास मदतदेखील झालेली आहे.
समाजातील अनाथ घटकांना सेवा देणे हे संस्थेचे मोठे कार्य असून, याच कार्याच्या जाणिवेतून दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी खोपोलीतील स्थानिक रहिवासी असलेले, परंतु दुर्दैवाने मनोरुग्ण ठरलेले भरत जाधव यांना अभ्यंगस्नान घालून दिवाळी साजरी केली जाते. रविवारी गगनगिरी आश्रमाजवळील पाताळगंगा नदी किनाऱ्यावर गरम पाण्याने आंघोळ घालून दिवाळी साजरी करण्यात आली. यानिमित्त भरतला फराळ देण्यात आला. दिवाळीच्या पहाटे ही स्वच्छता मोहीम पाचव्या वर्षी राबविण्यात आली.
यावेळी स्वच्छतादूत म्हणून धनराज जंबगी, बंटी कांबळे, दुर्गेश देवकर, मोईन खान, संतोष गायकर, अजय कांबळे यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशीका शेलार, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर, महिला संघटक नीलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, मार्गदर्शक राजेंद्र फक्के सल्लागार नरेंद्र हर्डीकर यांनी परिश्रम घेतले.