। अलिबाग । प्रतिनिधी ।
जागतिक दिव्यांग दिन ३ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात दिव्यांग सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कालावधीत विविध ठिकाणी अपंगांचे तपासणी शिबिर होणार आहे. त्याचा लाभ बांधवांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी केले आहे.
अपंगांसाठी ग्रामपंचायत स्तरापासून अनेक योजना सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत वेळेची सवलत, प्रवासासाठी सवलत अशा अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. परंतु त्यासाठी दिव्यांग वैश्विक ओळखपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाने ६ डिसेंबरला अलिबाग जिल्हा रुग्णालयात, ७ डिसेंबरला माणगाव उपजिल्हा रुग्णालय, महाड ग्रामीण रुग्णालयात ९ डिसेंबरला, तर म्हसळा ग्रामीण रुग्णालय ११ डिसेंबर आणि श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात १५ डिसेंबरला अस्थिव्यंग, नेत्र, मानसिक आजाराविषयी विशेष दिव्यांग तपासणी शिबिर होणार आहे.
या व्यतिरिक्त अस्थिव्यंग, नेत्र, कर्ण-मुकबधीर, भिषक व मानसिक आजाराविषयी दर बुधवारी अलिबाग जिल्हा रुग्णालय; तसेच दर शुक्रवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नियमित दिव्यांगांची तपासणी करण्यात येते.