उपक्रमाचे महिलांकडून कौतुक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने मुरूडमधील हिंदू एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात बुधवारी (दि.7) महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो सुवासिनींचे औक्षण करीत त्यांना सौभाग्याचं वाण देण्यात आले. हा कार्यक्रम मोेठ्या उत्साहात पार पडला. महिला सशक्तीकरणासाठी महिलांना एकत्र आणून प्रबोधन करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने अनेक महिलांनी चित्रलेखा पाटील आणि कृषीवल टीमचे कौतुक केले.
दुपारी तीन वाजल्यापासून महिला मुरूडमध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाला येण्यास सुरुवात झाली. बघता बघता महिलांची प्रचंड गर्दी झाली. सायंकाळी चारनंतर सिनेतारकांचे आगमन झाले. मराठी तारकांच्या उपस्थितीने महिलांचा आनंद द्विगुणित झाला.स्त्रीशक्तीच्या अस्मितेचा सन्मान व्हावा, महिलांचे संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उद्देश समोर ठेऊन कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी गेल्या 28 वर्षांची हळदीकुंकू समारंभाची परंपरा जपण्याचे काम कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्याने महिला वर्गांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. त्यात महिलांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम असल्याने उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सर्वच स्तरातील महिलांसोबत नात्याचा संबंध या सोहळ्याच्या माध्यमातून जपण्याचा महिलांनी प्रयत्न केला. पारंपरिक मराठमोळा पेहराव करीत आलेल्या महिलांच्या चेहर्यावर एक वेगळा उत्साह दिसून आला. ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश या सोहळ्याच्या रुपाने महिलांनी एकमेकांना दिला. महिलांचे औक्षण झाल्यावर त्यांना सौभाग्याचं वाण देण्यात आले. विलोभनीय सांज शृंगार करून हळदीकुंकू समारंभात दाखल झालेल्या सुवासिनींनी सौभाग्याचे वाण लुटले.
शिटी वाजवणे, काकूंनी काकांचे कामाचे कागद कराकरा कापले हे पाच वेळा बोलणे, सोनी मराठी आणि कृषीवलचे नाव येणारे उखाण, तळ्यात-मळ्यात, बोल फेकी अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. त्यात विजेत्या ठरलेल्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. कलाकारांच्या हस्ते त्यांना पैठणी देण्यात आली.
हळदी कुंकू समारंभानिमित्त मुरुडला येण्याची संधी मिळाली आहे. मुरुड माझ्यासाठी नवीन नसून आज मी माझ्या घरी आले. मुरुडला येणे-जाणे असते. त्यामुळे मला भरपूर आनंद झाला आहे .
शिवाली परब, कलाकार
अनेक मान्यवरांची उपस्थिती विजय गिदी, तुकाराम पाटील, रमेश दिवेकर, शरद चवरकर, धर्मा हिरवे, विकास दिवेकर, विजय म्हात्रे, कृषीवलचे व्यवस्थापक रुपेश पाटील, विक्रांत वार्डे, योगेश गिदी, निता गिदी, नम्रता कासा, प्रिता चौलकर, राजेश्री गायकर, संजीवनी कासार, भारती पणेन, प्रज्ञा कोदेरे, दिपाली पाटील, कलावती पाटील, सायली जाळगांकर, सुप्रिया भोपी, उषा जाळगांकर, प्रियांका चुनेकर, वैशाली नाक्ती, निता दिवेकर, कोमल गायकर, निलिषा दिवेकर, स्वाती वारगे, कल्पना आगरकर, तेजस्वी गिदी, जैमिनी आंबटकर, सारीका गिदी, दिपश्री आगरकर, जया नागुटकर, सुशीला चव्हाण, सुप्रिया गिदी, हिरकणी गिदी, योगिता चोगले, माधवी पाटील, रसिका नागोजी, नागेश्वरी हेमाडे, प्रिती पाटील, महिला आघाडी पदाधिकारी, कृषीवलच्या जाहिरात व्यवस्थापक हर्षा पाटील, भैरवी जाधव, समृद्धी म्हात्रे, सचिन गुप्ता, सुरेंद्र वेळे आदींसह मुरुड व अलिबागच्या महिला उपस्थित होते.
कलाकार थिरकले लेझीमच्या तालावर मान्यवरांचे आगमन झाल्यावर आई माऊली ग्रुप ढोल-ताशा पथक आणि खार आंबोल येथील लेझीम पथकाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ऋग्वेद फडके, मिरा, मल्हार या कलाकारांनी देखील लेझीमच्या तालावर नृत्य केले. यावेळी एक वेगळा उत्साह दिसून आला.
खेड्यापाड्यात राहणार्या, संसारात, आपल्या कामात व्यस्त असणार्या महिलांना एकत्र आणण्याचे स्वप्न सुप्रिया पाटील यांनी 28 वर्षापूर्वी बघितले. हे स्वप्न हळदी कुंकू समारंभातून प्रत्यक्षात उतरवण्याचे काम केले आहे. मुरुड, खोपोली, पाली अशा अनेक ठिकाणी हा सोहळा साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाची उंची व चर्चा वाढत आहे. सोनी मराठी वाहिनीतील कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असल्याने महिलांना त्यांना प्रत्यक्षात भेटण्याचा आनंद होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे हात लागले. त्यामुळेच हा कार्यक्रम आगळा वेगळा होत आहे. महिला कायमच कुटुंबासाठी झटत असतात. त्यांना आनंदाचा, आरोग्याचा, सन्मानाचा एक दिवस मिळावा, यासाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे. शेकाप नेहमी महिलांचा आदर करणारा पक्ष आहे.
चित्रलेखा पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख,
शेतकरी कामगार पक्ष
मुरुडला हळदी कुंकू समारंभ निमित्त येण्याची संधी मिळाली. कृषीवलने चांगला उपक्रम राबवला आहे. हजारोच्या संख्येने महिला सहभागी झाल्याने खूप आनंद झाला .
सिद्धार्थ खिरीट, कलाकार
महिला दिवसभर कष्ट करतात. स्वतःसाठी त्यांना वेळ मिळत नाही. मात्र कृषीवलने हळदीकुंकूच्या निमित्ताने महिलांसाठी कार्यक्रम घेतला आहे. हा कार्यक्रम महिलांच्या मानाचा आणि सन्मानाचा आहे. या निमित्त मुरुडला येण्याची संधी मिळाली आहे. त्याचा खूप आनंद झाला आहे.
संचिता कुलकर्णी, कलाकार