| पाली/गोमाशी | वार्ताहर |
प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला कर्तृत्वाला सलाम करत नगरपंचायतीच्यावतीने पाली नगरपंचायत हद्दीतील महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे लिमये सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे महिलांच्या विविधांगी कलागुणांना वाव मिळाला. यावेळी महिला स्वच्छता व आरोग्य कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रणाली सूरज शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पाली शहरातील महिलांसाठी प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची, लकी ड्रॉ या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाली शहरातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. विजयी स्पर्धकांना पाली नगरपंचायतीच्यावतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी माजी सभापती साक्षी दिघे व निंबाळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, स्त्रीशक्ती बळकट व्हावी यासाठी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच, यावेळी महिला व बालकल्याण समितीने नगरध्यक्षा प्रणाली शेळके यांचा व उपस्थित सर्व महिलांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका प्रतीक्षा पालांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अस्मिता कांबळे यांनी केले. पाली नगरपंचायतीच्यावतीने सर्व आलेल्या महिलांचे आभार नगरसेविका जुईली ठोंबरे यांनी मानले.







