उमेदवारीवरुन राष्ट्रवादीतच दोन गट
| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या मैदानातून माघार घेताच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी नाशिक लोकसभेतून उमेदवारी करण्याची तयारी दर्शवली. मात्र, पुन्हा भुजबळांच्या एका समर्थकाने उमेदवारी अर्ज घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच उमेदवारीहून दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीने हा तिढा वाढला होता. मात्र, त्यांना झालेल्या विरोधानंतर त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. भुजबळांची माघार होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील आणखी एक गट सक्रिय झाला आणि या गटाने माजी खासदार देविदास पिंगळे आणि विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवाय उमेदवारी मिळाल्यास आपण निवडणूक लढू, अशी भूमिका ही कोकाटे यांनी बोलून दाखवली.
स्वतः छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतलेली असताना दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज का घेतला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा एकदा मराठा पदाधिकारी विरुद्ध ओबीसी पदाधिकारी, असे दोन गट पडल्याच दिसून आल आहे. त्यामुळे आता नाशिकच्या जागेहुन महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याने ही जागा कोणाला मिळते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.