दुतर्फा वाहन पार्किंगमुळे स्थानीकांची गैरसोय
। महाड । प्रतिनिधी ।
संपूर्ण रायगडावर पसरलेली धुक्याची झालर आणि पर्यटकांना आकर्षित करणारे पावसाळी वातावरण यामुळे रायगडावर पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. यातच रविवारची सुट्टी असल्याने रायगड किल्ला हाऊसफुल झाला होता. यावेळी येथे आलेल्या पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची वाहतूक व्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली होती.
रायगड किल्ल्यावर सप्टेंबरनंतर पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. यावर्षी ऐन जून महिन्यातच पावसाळी पर्यटनाला वेग आला आहे. पहिल्या पावसातच किल्ल्यावरील कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असल्यामुळे पावसाळी पर्यटन वाढले असून रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे आणि पायी चालत जाण्यासाठी पर्यटकांच्या तसेच शिवभक्तांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी दोन ते तीन हजार पर्यटक रायगडावर दाखल झाले असून पाचाड पासून हिरकणीवाडी आणि पायथ्याकडे जाणार्या रस्त्यावर पर्यटकांनी दुतर्फा वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. रायगडवाडी आणि त्यापुढे जाणार्या स्थानिक ग्रामस्थांना वाट काढणे कठीण झाले होते.
पाचाड ते किल्ले रायगड यादरम्यान पर्यटक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावतात. रोप-वेकडे जाणार्या मार्गापासून चित्त दरवाजापर्यंत अरुंद रस्ता आहे. तसेच येथील रस्त्यावर साईडपट्टी नसल्यामुळे वाहनचालक रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने पार्क करत आहेत. यामुळे अन्य वाहनांना पुढे जात येत नाही. किल्ले रायगडच्या पलीकडे रायगडवाडी, निजामपूर, वाघेरी, बावळे, कोळीआवाड हि गावे येतात. या गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी खासगी वाहने तसेच एसटी सेवा उपलब्ध आहे. मात्र, पर्यटकांनी दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळे एसटीला पुढे जाता येत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वयोवृद्ध ग्रामस्थांना चित्त दरवाजा येथून निजामपूर, रायगडवाडी या ठिकाणी चालत जाण्याची वेळ येत आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत याठिकाणी एक पोलीस चौकी आहे. मात्र, याठिकाणी दुतर्फा वाहने लावून गेल्यानंतर व्यवस्था करणे कठीण होते.
पार्किंग व्यवस्था मजबूती करणाची गरज किल्ले रायगडावर यापूर्वी पावसाळ्यामध्ये कोणीच येत नव्हते. जून महिन्यापासून ते अगदी ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी फारच तुरळक पर्यटक दाखल होत होते. मात्र, आता पर्यटकांची गर्दी खूपच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापेक्षाही अधिक पर्यटक रविवारच्या सुट्टीमध्ये किल्ले रायगडावर दिसून आले. यामुळे रस्ता रुंद करण्याबरोबरच पाचाड रायगड वाडी या ठिकाणी उत्तम पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे.