मावळेंच्या नाशिकमधील लॉकरची घेणार झडती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे आणि मुख्यलिपिक सुहास दवटे यांना आज अलिबाग जिल्हा न्यायाधीश दुसरे आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश थत्ते यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना अधिक तपासासाठी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्या नाशिक येथील गोदावरी बँकेत असलेल्या लॉकरची झडती घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक रवाना होणार आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.भूषण साळवी यांनी माळवे याचे नाशिक येथील गोदावरी बँकेत लॉकर आहे. तसेच इतर कार्यालयातील प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण प्रकार झाले आहेत का असा युक्तिवाद करून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. आरोपी पक्षातर्फे अॅड.प्रवीण ठाकूर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश थत्ते यांनी माळवे आणि दवटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील तपास लाच लुचपत विभागाकडून सुरू आहे. सहकार संस्थेच्या कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे आणि मुख्य लिपिक सुहास दवटे यांनी रोहा अष्टमी येथील एका सोसायटी नोंदणी प्रकरणाची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी 40 हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून 27 सप्टेंबर रोजी माळवे आणि दवटे यांना लाच स्वीकारताना अटक केली. आज 28 सप्टेंबर रोजी माळवे आणि दवटे या दोघांना लाच लुचपत विभागाने अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केले.







