सतीश मनेशिंदे वकीलांचा न्यायालयात युक्तिवाद
। मुंबई । प्रतिनिधी ।
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणाखाली अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यावर एनसीबी अधिकार्यांनी आर्यन खान, त्याचा मित्र आरबाज मर्चंट आणि फॅशन डिझायनर मुनमुन धमेचा या तिघांना न्यायालयात हजर केले. तसेच या प्रकरणात हाती लागलेले पुरावे न्यायालयात सादर करत त्यांच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी दिली आहे. या प्रकरणात आज आर्यनला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
आर्यन खानची बाजू मांडत वकील सतीश मनेशिंदे यांनी न्यायाधीशांना सांगितले, की आर्यन खानला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आर्यनकडे बोर्डिंग पास नव्हता आणि कोणतीही सीट किंवा केबिन नव्हते. तसेच जप्ती करण्याच्या वेळी आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स किंवा आमली पदार्थांचा साठा सापडला नाही. त्याला फक्त व्हॉट्स अॅप चॅट्सच्या आधारावर अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. तसेच वकील सतीश मनेशिंद आज न्यायालयासमोर आर्यनसाठी जामीनाचा अर्ज करणार आहेत.