। म्हसळा । वार्ताहर ।
देशातील अनेक राज्यांत गुरांना लंपी रोगाची बाधा होऊन हजारो गुरे दगावली असल्याच्या घटना घडल्या आहेत. या साथीने मागील 10 महिन्यांपुर्वी रायगड जिल्ह्यात गुरांना बाधा झाली होती. वेळीच पशु वैद्यकीय विभागाने गुरांना लसीकरण करून लंपी साथ नियंत्रणात आणली होती. परंतु, लंपी बाधेने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रत्यक्ष म्हसळा तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात लंपीची लागण झालेली गाय गुरे फिरताना दिसत आहेत. या आजारावर वेळीच आवर घालण्यासाठी पशू वैद्यकीय विभागाने गुरांचे लसीकरण मोहीम पुन्हा सुरु करण्याची गरज आहे. 9 डिसेंबर 2023 मध्ये म्हसळा तालुका शहरात लंपीची लागण झालेली गाय गुरे आढलली होती. आता या आजाराने पुन्हा डोके वर काढले आसल्याने शेतकरी वर्गाचे गोधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.







