राज्य सरकारकडून मतदारांना आमिष
। मुंबई । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रलंबित राहिलेले सर्व निर्णय जाहीर करण्याच्या मागे राज्य सरकार लागले आहे. मात्र, हे करीत असताना निधी उपलब्ध आहे का, याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला दिसून येत नाही. आचारसंहिता लागेपर्यंत शासन निर्णयाचा राज्य सरकारकडून धडाका लावण्यात आला असून, गेल्या दहा दिवसांत बाराशेपेक्षा अधिक शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या शासन निर्णयातून सर्वच समाजघटकांना निवडणुकीपूर्वी खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विविध समाज घटकांच्या नोकरदारांच्या मागण्यांचा विचार करत शासन निर्णयाचा सपाटा लावण्यात आला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून 1 ऑक्टोबरला 148 शासन निर्णय जारी करण्यात आले. तसेच 2 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी, 3 ऑक्टोबरला 203, 4 ऑक्टोबरला 188, 5 ऑक्टोबरला 2, 6 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी, 7 ऑक्टोबरला 209, 8 ऑक्टोबरला 150, 9 ऑक्टोबरला 197, 10 ऑक्टोबर 194 असे एकूण दहा दिवसांत 1291 शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.







