। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताच्या अखिल शेओरानने नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यातील स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले. पहिल्या दिवशी सोनम मसकरने 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक पटकावले होते. सलग दुसर्या दिवशी भारताला अखिलने पदक मिळवून दिले. मात्र, अन्य भारतीय स्पर्धकात विशेषत: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजांनी निराशा केली. ऑलिम्पियन रिदम सांगवान 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात कांस्यपदकापासून दूर राहिली. चीनच्या नेमबाजांकडून रिदम शूटऑफमध्ये पराभूत झाली. अखिलने पॅरिस ऑलिम्पिकच्या हुकलेल्या संधीचे दु:ख कांस्यपदक मिळवून हलके केले. जागतिक स्पर्धेतून अखिलनेच भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळविला होता. पण, निवड चाचणीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला अंतिम संघातील स्थान गमवावे लागले होते. मी निराशेवर मात केली आहे. लॉस एंजलिस 2028 ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवूनच मी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी मी कठोर मेहनत घेतली. गुडघे टेकून नेम साधण्याच्या पद्धतीत फारसे यश मिळत नव्हते. पण, अन्य दोन प्रकारात मी चांगली कामगिरी करून पदक मिळवले, असे अखिल म्हणाला.
अखिल 589 गुणांसह पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर राहिला. चेन सिंगही 592 गुण मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. मात्र, अंतिम फेरीत चेन अपयशी ठरला. त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अखिलने 452.6 गुणांसह कांस्यपदक पटकावले. त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या लियू युकुनचे आव्हान परतवून लावले.
महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारतीय नेमबाज अपयशी ठरल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती आशी चोक्से 587 गुणांसह पात्रता फेरीत नवव्या स्थानावर राहिली. निश्चलही पात्रता फेरीतच अडखळली. तिला 585 गुणांसह दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पियन विजयवीर सिधू आणि अनिश भावनाला यांनी 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात निराशा केली.
अखिल 589 गुणांसह पात्रता
फेरीत सहाव्या स्थानावर राहिला. चेन सिंगही 592 गुण मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. मात्र, अंतिम फेरीत चेन अपयशी ठरला. त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अखिलने 452.6 गुणांसह कांस्यपदक पटकावले.