43 हजार नवीन मतदार नोंदणी, 6 लाख मतदारांची संख्या
। पनवेल । प्रतिनिधी ।
विधानसभा मतदारसंघात नव्याने झालेल्या मतदार नोंदणीत सुमारे 43 हजार मतदार वाढल्याने पनवेल विधानसभेची मतदारसंख्या 6 लाखांच्या पार झाली आहे. यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार शहरी भागातील आहेत. या मतदारांवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.
एकेकाळी उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ एकच होते. सिडको प्रकल्पामुळे नवीन नोड स्थापन केले गेले. या नोडमध्ये कालांतराने शहरी मतदार वाढू लागले. शिवाय तालुक्यातील 23 ग्रामपंचायती पनवेल महानगरपालिकेत विलीन होऊन पनवेल महापालिका उदयास आली. मुंबईतील वाहतूक कोंडी, प्रदूषण, गर्दी यामुळे अनेकांनी पनवेल परिसरात धाव घेतली. यामुळे झपाट्याने शहराची लोकसंख्या वाढली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील 544 पैकी जवळपास 370 बूथ शहरी भागातील असल्यामुळे येथील उमेदवारांना शहरी मतदारांवर आपली छाप सोडावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पनवेल विधानसभेत भाजपकडून आमदार प्रशांत ठाकूर, शेकापमधून माजी आमदार बाळाराम पाटील तसेच उद्धवसेवेतून शिरीष घरत आणि लीना गरड यांची नावे चर्चेत आहेत. अपक्ष म्हणून कांतीलाल कडूदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पनवेलमधील मतदार-3,37,909 पुरुष 2,96,215 महिला आणि 73 तृतीय पंथी अशी 6,34,197 एकूण मतदारांची संख्या आहे.
शहरी भागात खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, नावडे, कामोठे, तळोजे या सिडकोनिर्मित वसाहतीत 317 बूथ आहेत. तर ग्रामीण भागात 144 बूथ आहेत. यामध्ये देखील ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना 31 हजारांचा लीड मिळाला होता, तर उद्धवसेनेच्या मशाल चिन्हावर लढणार्या संजोग वाघेरे यांनादेखील पनवेलध्ये फटका बसला होता. यामुळे शहरी मतदारांवर डोळा ठेवून अनेक संभाव्य उमेदवारांनी आपल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये सिडकोने नैना प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पाच्या धोरणाविरोधात वेळोवेळी निदर्शन करण्यात आली. नैना प्रकल्पाबाबत नाराजी हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा आहे.
पनवेलची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिडको एकीकडे हजारो घरांचे गृहप्रकल्प उभारत असताना दुसरीकडे पूर्वीच्या गृहप्रकल्पांना मुबलक पाणी मिळत नाही. याव्यतिरिक्त पालिका हद्दीत वाढीव मालमत्ता कर, प्रदूषण हे विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारद संघात कोणता उमेदवार कशा प्रकारे मतदारांवर छाप पाडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, तसेच मतदारा राजा हा कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार हे मतदान यंत्र उघडल्यावरच समोर येणार आहे.







