| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील ओणी बाजारपेठेतील ज्वेलर्सची दोन दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महामार्गावर ओणीसारख्या वसलेल्या बाजारपेठेत चोरी झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील तालुक्यातील ओणी बाजारपेठेत खरवते येथील सूर्यकांत सागवेकर आणि चुनाकोळवण येथील रवींद्र देवरुखकर यांची ज्वेलर्सची दुकाने आहेत. देवरुखकर यांचे दुकान ओणी-कळसवली तिठ्यालगत तर, सागवेकर यांचे दुकान मुख्य बाजारपेठेत आहे. शुक्रवारी सायंकाळी या दोन्ही दुकानाचे मालक नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आपल्या घरी गेले. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आले असता दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील किमती वस्तू चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







