। पाली/बेणसे । वार्ताहर ।
राज्यात सर्वत्रच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र, मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. यावेळी जिल्ह्यात 65.86 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या निवडणुकीपेक्षा 4.39 टक्क्यांची तफावत दिसून आली. यामुळे प्रशासनाकडे मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन आहे.
मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसून आले होते. ही बाब चिंताजनक आहे. 20 नोव्हेंबर रोजी दिग्गज उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडेल, हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे निवडणुकी आधी जिल्हा प्रशासनाकडून मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती होत आहे. ठिकठिकाणी जनजागृती, प्रभात फेर्या, मतदान जागृती कार्यक्रम, पथनाट्य असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रसिद्धी माध्यम, जाहिरात, पथनाट्य, बॅनरबाजी या मार्गाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, महसूल प्रशासन यांच्यामार्फत देखील मतदार जनजागृती करण्यात येत आहे. वेळोवेळी राजकीय पक्षांनीही मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, हे प्रयत्न देखील अपुरे पडत असलेले दिसत आहेत.
लाडक्या बहिणींवर मदार
मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले होते. यावेळी जिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला होता. मात्र, महिलांचा मतदानाचा घसरलेला टक्का चिंताजनक आहे. यंदा लाडकी बहीण योजना राबविण्यात आली आहे. यामुळे या लाडक्या बहिणी मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे.
मतदानाकडे पाठ
2019 च्या विधानसभा निवडणुकीत 35 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. यावेळी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार होते. 2714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. 7 लाख 82 हजार 580 पुरुष मतदार, 7 लाख 13 हजार 782 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकूण 14 लाख 96 हजार 363 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 2014 च्या तुलनेत या मतदारसंघांमध्ये पनवेल 12.6, कर्जत 4.45, उरण 3.35, पेण 0.16, अलिबाग 0.46 श्रीवर्धन 1.59, महाड 0.14 ने टक्केवारी घसरली होती. एकूण 4.39 टक्क्याने मतांचा टक्का घसरला होता.