प्रचार फेरीदरम्यान एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शहापूर परिसरात अपक्ष उमेदवार दिलीप भोईर आणि शिंदे गटातील उमेदवार आमदार महेंद्र दळवी प्रचार रॅलीच्यावेळी आमनेसामने आले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनीदेखील दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे वातावरण शांत करताना त्यांची दमछाक उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
अलिबाग, मुरूड, रोहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार सुरु आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रचार करीत होते. त्याचवेळी दुपारी आ. दळवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार रॅली समोरून आली. दिलीप भोईर आणि महेंद्र दळवी गट आमनेसामने आल्यावर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणा केल्या. ‘… बाकी सब भंगार’ असा टोला आ. दळवींना लगावत दिलीप भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आल्यावर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दोन्ही गटात वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. एकमेकांविरोधात घोषणा होत असल्याने हा वाद विकोपाला जाण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करीत वातावरण शांत केले.