अखंडित वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी
| उरण | वार्ताहर |
अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर वीजसुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे. आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे विजेशिवाय चालूच शकत नाहीत. टीव्ही, मोबाईल, फॅन, कुलर, एसी, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वाहने आणि उपकरणे विजेशिवाय चालूच शकत नाही. विजेचा वापर आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतच चालली आहे. मात्र उरण मध्ये या अत्यावश्यक सेवेचा तीनतेरा वाजले आहेत. गेले चार ते पाच दिवस दररोज पहाटे उरण शहरात वीज बंद होत आहे. पहाटे पहाटे वीजपुरवठा बंद होत असल्यामुळे उरण शहरातील नागरिक हैराण झाले आहेत.
दररोज वीज जात असल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, ऐसी, कुलर आदी उपकरणे बंद पडत आहेत. याचा आर्थिक फटका विनाकारण ग्राहकांना बसत आहे. पहाटे कधी 4 वाजता तर कधी पहाटे 5 वाजता वीज जात असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. ग्राहकांना वीज बिले वेळेत दिली जातात. पैसे नाही भरले तर मीटर कापून नेले जाते. वीजपुरवठा बंद केला जातो. मात्र, ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरूनसुद्धा ग्राहकांना महावितरणतर्फे विजेची चांगली सुविधा मिळत नसल्याने उरणमधील जनता महावितरणच्या कारभारावर प्रचंड प्रमाणात नाराज आहेत.