तुळशीच्या लग्नानंतर विवाह सोहळ्यांची धूम
| उरण | वार्ताहर |
कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह आटोपताच लग्नसोहळे सुरू झाले. उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला आहे; परंतु या सर्व भानगडी शेतकर्यांची मुले मात्र कायमच उपेक्षित असल्याचे चित्र यंदाही पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणार्यांना, व्यावसायिकांना प्राधान्य दिले जात असल्याने यंदाही शेतकर्यांना कारभारीण मिळणे कठीण जाणार आहे.
अलीकडे जोडीदार निवडताना शिकलेल्या मुली, त्यांचे पालक आपल्या मुलींसाठी शिकलेला सरकारी नोकरी घरी थोडीफार शेती असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. खासगी नोकरी आणि सध्या कमी पगार असला तरी चालेल; पण तो शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. जुन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार, तर कनिष्ठ नोकरी समजली जायची. आता मात्र उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात आहे. अलीकडे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उच्चशिक्षित, निर्व्यसनी, घरंदाज, कमविता वर मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. यामुळे शेतकरी, शेतमजूर वरांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मुलांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षण-नोकरी-व्यवसायात स्वतःला सिद्ध करताना घाम गाळावा लागत आहे.
गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले उपवर तरुण व त्यांचे कुटुंबीय ‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणून एखादी मुलगी पाहा हो असा सूर आळवत आहेत. वधू-वर संशोधन केंद्रातही आता ‘वधू पाहिजे’साठी नवरदेवांची नोंदणी वाढली आहे. त्यातच आता वराकडील मंडळी दोन्ही बाजूंचा खर्च करण्याची तयारी दर्शवीत आहेत.
राजकीय उदासीनतेचा शेतकर्यांना फटका पूर्वी शेतीला प्रतिष्ठा होती; परंतु आता शेती व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. शेतकर्याच्या मुलीने आपल्या वडिलांचे काबाडकष्ट व शेतीची वाताहत डोळ्यांनी बघितलेली असते. त्यामुळेच मुलींनाच शेतकरी नवरा नको आहे. ही सामाजिक समस्या निर्माण होण्यास राजकीय उदासीनता दुर्लक्ष तेवढेच कारणीभूत आहे.
आजही मुलांपेक्षा मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण कमी आहे. त्यातच ग्रामीण भागात मुलांपेक्षा मुलींचा शिक्षणाकडे अधिक कल आहे. मुलांपेक्षा मुली उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे कमी शिकलेला मुलगा त्यांच्या पसंतीस उतरत नाही. परिणामी, उपवर-वधूसाठी नवरदेवाकडील मंडळींना वधूसंशोधन करावे लागत आहे. पूर्वी वरपित्याच्या घराचे उंबरठे झिजवावे लागत असे. आता उलट चित्र निर्माण झाले आहे.