| महाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहराजवळील गांधारपाले येथील प्राचीन बौद्धकालीन लेणी परिसरात मुख्य लेण्यांकडे जाणारी वाट संरक्षक लोखंडी कठडा नसल्यामुळे धोकादायक बनली आहे. ही लेणी तीन स्तरांमध्ये कोरली असून, सर्वात वरच्या स्तरावर जाणारी वाट निसरडी व खडतर आहे. त्यामुळे पर्यटकांना संपूर्ण लेणी पाहण्याचा आनंद घेता येत नाही.
लेणी महामार्गावरच असल्याने योग्य सुविधा पुरवल्या गेल्यास या भागातील पर्यटन विकासाला गती येऊ शकेल. महाड तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात प्रामुख्याने गांधारपाले येथील प्राचीन बौद्ध लेण्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. दूरदूरहून आलेले पर्यटक, अभ्यासक, विविध शाळांच्या सहली या लेणी परिसराला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाहीत. ही प्राचीन बौद्धकालीन लेणी असल्यामुळे अनेक बौद्ध अनुयायी, आंबेडकरी जनता या ठिकाणी असलेल्या बुद्धमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येतात. लेणी कुंभोज वंशातील विष्णुपुलीत राजाच्या काळात खोदलेली आहेत. येथे एकूण 28 लेण्यांचा समूह आहे.पहिल्या स्तरात 20 आणि उर्वरित लेणी अन्य स्तरांमध्ये आहेत. लेणी पूर्वाभिमुख असून, लेण्यांमध्ये बसण्यासाठी दगडी बाक, पाण्याची व्यवस्था, ध्यानधारणेसाठी खोल्या, प्रार्थना घरे तसेच लोकांना बसता यावे म्हणून भव्य सभागृह खोदले आहे. लेण्यातील काही खोल्यांतून पाली भाषेतील शिलालेखदेखील दृष्टीस पडतात. येथील एका शिळेवर पद्मासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे. खोल्या, सभागृह, दीर्घिका, स्तंभ, अर्थस्तंभ, चैत्यगृह, शिलालेख, ओटे, वेलबुट्टी, नक्षीकाम, दगडी पाण्याचे टाके असे अनेक प्रकार लेण्यांमध्ये असल्याने पर्यटक, अभ्यासक व इतिहास संशोधकांना ही लेणी महत्त्वाची वाटतात.
मुंबई-गोवा महामार्गालगतच लेणी असल्याने या ठिकाणी पर्यटक तसेच इतिहास अभ्यासक मोठ्या प्रमाणात येत आहेत. परंतु लेण्यांच्या वरच्या बाजूस जाण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे. पुरातत्त्व विभागामार्फत गांधारपाले लेण्यांचे ऐतिहासिक प्राचीन महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी पायर्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.लेण्याच्या चढाईपासून पूर्णपणे पायर्या बांधण्यात आल्यामुळे पर्यटकांना कोणताही धोका नाही. तसेच वरच्या पहिल्या टप्प्यात लोखंडी संरक्षक कठडा असल्याने तेथेदेखील पर्यटकांना पोहोचणे शक्य होत आहे. परंतु त्यानंतरच्या टप्प्यात काही ठिकाणी पायर्या मोडकळीस आल्या असून, कठडादेखील कोसळला आहे. पुढील टप्प्यात हा कठडाच नसल्याने आणि या ठिकाणी खोल दरी असल्याने पर्यटकांसाठी धोकादायक परिस्थिती उद्भवली आहे. अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालून दगड व कातळाला पकडून वरची लेणी पाहण्याचा प्रयत्न करतात. पुरातत्त्व विभागाने याची लवकर दखल घेऊन प्राचीन ऐतिहासिक वारसा पाहणे सर्वांनाच सहज शक्य व्हावे, यासाठी या सर्व आवश्यक सुरक्षित उपाययोजना पूर्ण कराव्यात अशी मागणी पर्यटक, गिरीप्रेमी तसेच दलित बांधवांकडून केली जात आहे. पुरातत्त्व विभागाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असल्याने याबाबत अधिक संपर्क होऊ शकला नाही.