नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अरविंद केजरीवाल सरकारने राजधानीतील शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी राज्य सरकारने शेतकर्यांना प्रति हेक्टर 50,000 मदत देण्याची घोषणा केली आहे. हा आकडा महाराष्ट्रातील शेतकर्यांपेक्षा तिपटीने जास्त आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना याचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्रातही मदत जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील जिरायती शेतजमीनीसाठी हेक्टरी 10 हजार तर, बागायतीसाठी हेक्टरी 15 हजारांची मदत सरकारने जाहीर केली आहे.
राजधानीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी ही घोषणा केली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी दु: खी आहेत, दु: खी होऊ नका, असं केजरीवाल म्हणाले. नेहमीप्रमाणे सरकार तुमच्या पाठीशी आहे. मी आदेश जारी केले आहेत की ज्या शेतकर्यांची पिके गमावली आहेत त्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि जिल्हा दंडाधिकारी (डीएम) सर्वेक्षण करत आहेत. ही प्रकिया दोन आठवड्यांच्या आत पूर्ण केली जाईल. त्यानंतर शेतकर्यांना थेट बँक खात्यात दोन महिन्यांच्या आत भरपाई मिळेल, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.