अन्यथा 14 मेपासून उपोषण करण्याची भूमिका
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणार्या कर्मचार्यांचे तीन महिन्यांचे मानधन रखडले आहे. मानधनाविना हे कर्मचारी काम करीत आहेत. सरकारकडून निधी न आल्याने कर्मचार्यांचे मानधन थकले आहे. संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर येत आहे. अन्यथा 14 मेपासून आमरण उपोषण करण्याची भूमिका त्यांची असण्याची शक्यता आहे. कर्मचार्यांच्या उपोषणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा वेगवेगळ्या पदांवर काम करणार्या कर्मचार्यांची संख्या एक हजार 45 इतकी आहे. ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांमध्ये प्रभावीपणे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी हे कर्मचारी काम करतात. परंतु, त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. मानधनाविना काम करीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकजण मानसिक तणावाखाली आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, असा प्रश्न या कर्मचार्यांसमोर उभा ठाकला आहे.
सध्या जिल्ह्यात उष्णता वाढली आहे. उष्माघाताला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उष्माघात केंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उष्माघातावर अंकुश ठेवण्यासाठी हे कर्मचारी रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत. रुग्णांना चांगल्या सेवा देण्याचे काम करीत आहेत. परंतु, या कर्मचार्यांच्या मानधनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निधी संबंधित विभागाला उपलब्ध होतो. मात्र तीन महिने होत आली, तरीदेखील सरकारकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचार्यांचे मानधन रखडले आहे. अखेर संतप्त झालेल्या कर्मचार्याने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सरकारने दहा दिवसांत मानधनाबाबत निर्णय घेतला नाही, तर येत्या 14 मेपासून आमरण उपोषण केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कर्मचार्यांच्या उपोषणाचा फटका ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
एनआरएच अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांच्या मानधनासाठी निधी उपलब्ध झाला नाही. संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संपर्कही साधला आहे. परंतु, येत्या चार दिवसात निधी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
– डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बिघडला आहे. मानसिक ताण निर्माण झाला आहे. सरकारने तातडीने मानधन द्यावे.
– कर्मचारी (नाव न सांगण्याच्या अटीवरून)







