| पनवेल | वार्ताहर |
खारघर टेकडीवर पावसाळी उत्सव साजरा करताना काही तरुण अडकल्याची घटना नुकतीच घडली आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक धबधब्यांकडे जातात आणि त्यांना थांबवता येत नाही. त्यामुळे सरकारने खारघर डोंगर परिसर इको टुरिझम आणि जलसंवर्धन प्रकल्प म्हणून विकसित करावा, अशी मागणी नॅटकनेक्ट फाऊंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खारघरमध्ये विस्तीर्ण डोंगररांगांमुळे पर्यटक कुठूनही टेकड्यांवर जात असल्याचे खारघर हिलँड वेटलँड्स फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी वन विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. वन विभागाने पांडवकडा धबधब्यावर बंधारा उभारून पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी खोली बांधली आहे. मात्र, ही खोली धूळखात पडली आहे. नैसर्गिक संपत्तीचे वरदान नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे पदाधिकारी बी.एन. कुमार म्हणाले की, पांडवकडा हा धबधबा असताना स्थानिकांना लोणावळा-खंडाळा आणि माळशेज घाटावर जावे लागते. या शहराला खारफुटी, पाणथळ जागा, फ्लेमिंगो, टेकड्या, धबधबे, तसेच डोंगरांचे वरदान मिळाले आहे. तसेच, खारघर आणि बेलापूरच्या डोंगरावरून पावसाचे पाणी या ठिकाणी साठवता येते. बेलापूर-खारघर डोंगरावर निसर्ग उद्यान प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करावे आणि नवी मुंबईला इको-टुरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करावे, अशी मागणी केली असून डिजिटल मोहीम सुरु करण्यात आली आहे.






