| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा विधी सेवा मार्फत जे कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमांचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करताना आपले कार्यक्रम हे नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दुसरे जिल्हा न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन अलिबागमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश तेजस्विनी निराळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ॲड. ए.डी.पाटील, कर्मचारी, वकील वर्ग, पक्षकार इतर कमिटी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कायदेविषयक जनजागृती झाली पाहिजे. पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना न्याय मिळून देण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरणाची नेहमी तत्पर मोफत सेवा असणार आहे, असेही त्या म्हणाल्या. अलिबाग बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यक्रम हे सोशल मीडियावरून लोकांमार्फत पोहोचले पाहिजे. यावेळी ॲड निलोफर शेख यांनी, घरगुती हिंसाचार 2005 अंतर्गत पीडित महिलांना कायदेशीर मदत पुरविणे या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. पियुष गडे यांनी एडीआर पद्धती आणि फायदे तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले.






