| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून 6 हजार 900 रुपयांची रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली होती. ती रक्कम चोरणाऱ्या चोरट्याचा तपास करताना त्याच्याकडून दोन मोटरसायकलींसह 3 हजार रुपये रोख रक्कमसह हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 24 तासात आरोपीला ताब्यात घेण्यात पोलादपूर पोलिसांना यश आले आहे.
पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या आशीर्वाद जनरल स्टोअर्समध्ये 13 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्याने दुकानातील लोखंडी शटर उचकटून एकूण 6 हजार 900 रुपयांची चोरी केली होती. या घटनेची माहिती दुकानदार अजय गांधी यांनी 17 जुलै रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून शहरामधील जवळपास 8 ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यात एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्यांनतर त्याची ओळख पटविण्यात यश येऊन संशयित व्यक्तीचा मामा हा पोलादपूर नजीक रानबाजीरे आदिवासी वाडीत राहत असल्याचे समजले. तात्काळ त्यांच्याकडे जाऊन त्यांना ते फुटेज दाखविण्यात आले आणि चोराची ओळख पटविण्यात आली. त्याचे नाव राजू दिनेश मुकणे (25) असून, तो महाड येथील कावळे कुंभार्डे आदिवासी येथे असल्याचे समजले. त्या अनुषंगाने कावळे कुंभार्डे गावात पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी (दि.18) राजू मुकणेला अटक करण्यात आली. अटके दरम्यान त्याने पोलादपूरमध्ये 1 आणि कापूरहोळ-पुणे येथे 1 दुचाकी चोरल्याचे कबूल केले.







