| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई- पुणे जुन्या महामार्गांवर बोरघाटात सायमाळ जवळ ट्रकने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुबंई- पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातून ट्रक चालक मुबारक हा खोपोलीहून – लोणावळाकडे जात होता. बोरघाटात ट्रक चढत नसल्याने त्याने पुन्हा ट्रक खोपोलीकडे वळवून परत जात असताना, सायमाळ जवळील तीव्र उतारावरील वळणावर आला असता त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिल्याने कार आणि ट्रक खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चालक बाबू चंद्रकांत जाधव, विद्या जाधव, बाबू जाधव, अवण्या जाधव, रा. सर्व घोडे भारूड महाबळेश्वर हे गंभीर जखमी झाले आहेत. तर मयत महिलेचे नाव समजले नाही. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य आयआरबी टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मधील अडकलेल्या जखमीना बाहेर काढून तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.







