। पनवेल । वार्ताहर ।
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर पाण्याचा प्रवाहात अडकलेल्या तरुणाची अग्निशमन जवानांनी सुटका केली आहे. विकास पांडे (25) असे धबधब्यावर अडलेल्या तरुणाचे नाव असून तो खारघर येथील रहिवासी आहे. दरम्यान, नियम धाब्यावर बसवून धबधब्यावर जाणार्या पर्यटकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खारघर परिसरातील धबधबा, तलाव परिसरात पोलिसांकडून पावसाळी पर्यटनासाठी मनाई करण्यात आली असून धबधब्याकडे जाणार्या रस्त्यांवर मनाईचे फलक देखील लावले आहे. असे असूनही खारघरमधील विकास पांडे हा तरुण पांडवकडा धबधब्यावर पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता. दरम्यान, दुपारी डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे तो नाल्याच्या मोठ्या प्रवाहात अडकला. याबाबत खारघर अग्निशमन जवानंना माहिती मिळताच जितेंद्र राजपूत, केतन पाटील, गुरुनाथ तांडेल, कुणाल पाटील, निशिकांत पाटील, विकास सूर्यवंशी, गोविंद गडगे, आदि जवानांनी अनेक अडचणी मात करुन तरुणाला सुखरुप बाहेर काढले.







