| मुंबई | प्रतिनिधी |
शाडू मातीनंतर आता पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी मोफत रंगांचे वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सहा प्रकारच्या पर्यावरणपूरक रंगांचे वाटप करण्यात येणार असून, 10 हजार 800 लिटर्स पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीकडे वळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने मूर्तिकारांना मोफत शाडूच्या मातीसह आता रंगही मोफत
उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडून मूर्तिकारांना मोफत शाडू माती, प्रथम येणाऱ्यास ‘प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात आली असून मंडपाकरीता जागा व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता सहा पर्यावरणपूरक रंग उपलब्ध केले जाणार आहेत. यात 7 हजार 800 लिटर्स रंग आणि 3 हजार लिटर्स इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर पांढरा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि लाल असे सहा पर्यावरणपूरक रंग पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये अन्य रंगांच्या तुलनेत पांढरा रंग मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक पांढरा प्रायमर ही देण्यात येणार आहे.
मूर्तिकारांनी आपापल्या परिसरातील प्रशासकीय विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका उप आयुक्त, प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. 952 टन मातीचे वाटपमूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. आतापर्यंत 952 टन माती पुरविण्यात आली आहे. यासोबतच 997 मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडपासाठी जागाही देण्यात आल्याचे पालिकेकडून सांगितले.
पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा
मुर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग रासायनिक असल्यामुळे ते पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा, व जलाशयांचे प्रदूषण टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.





