माथेरान पोलिसांचा इशारा
नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषदेसह पोलीस प्रशासनाने स्थानिक अश्वपालकांना भेडसाविणार्या समस्या जाणून घेण्याबरोबरच पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरविणे, तसेच अवाच्या सव्वा दर आकारणे, विनापरवाना घोडे चालविणे अशा नियमांचे पालन न केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला आहे.
नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर उपस्थित होते. स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम ,लहू शिंगाडे यांनी विविध समस्या मांडल्या. यावर मुख्याधिकारी भणगे यांनी पर्यटकांना घोडे सवारीची प्रिंपेड सेवा देण्याकरिता लवकरात लवकर आवश्यक केबिन व्यवस्था, तसेच प्रेक्षणीय स्थळांवर जाण्यासाठी 2013 सालच्या शासकीय दरपत्रक लावण्याचे आश्वासन दिले. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी अश्वपालकांची कानउघाडणी केली. दस्तुरी नाक्यावर नियमानुसार फक्त पाचच अश्वपालकांनी गणवेशात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले.याप्रसंगी स्थानिक अश्वपाल संघटना व मुळवासीय अश्वपाल संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.