| रत्नागिरी | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील चिपळूण येथे आता सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरीच खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडामुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. वर्षा जोशी (63) असे या सेवानिवृत्त शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरातील रावतळे परिसरातील घरात वृद्ध शिक्षिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. 68 वर्षीय शिक्षिका तिच्या घरी एकटीच राहत होती. मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली. वर्षा जोशी यांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र या कॅमेऱ्याची हार्डडिस्क गायब आहे. सीसीटीव्हीचा डीव्हीआरही गायब असल्यानं कट रचून हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या महिलेच्या अंगावर अनेक जखमा असून, पोलसांनी मृतदेह शवविच्छदेनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. महिलेचे हातपाय घट्ट बांधण्यात आले होते. तसंच शरीरावर गंभीर जखमांचे व्रणही होते. हत्येवेळी महिलेनं स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हत्या कुणी केली, का केली याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.







