| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथे असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना जंगलातील रानभाज्या यांचे महत्व समजावे यासाठी हा महोत्सव भरवण्यात आला होता.
चाफेवाडी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मध्ये रायगड कीस्टोन फांऊडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या आणि माशांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात आपल्या दैनंदिन आहारातील रानभाज्यांचे महत्व सांगणारे प्रदर्शन भरवले होते. त्याचवेळी जंगल परिसरात मिळणाऱ्या माशांचे प्रत्यक्ष प्रदर्शन व त्यांचे महत्त्व विशद करणारे चर्चासत्र आयोजित केले होते. शाळेचे मुख्याध्यापक एम पी पाटील आणि क्रिस्टन फाऊंडेशनचे सोनवणे तसेच शाळेचे अधीक्षक चव्हाण, अधीक्षिका शिरसागर तसेच जिजाबाई पादीर, सविता पादीर, जगन पादीर आणि उमेश सोनीने आदी उपस्थित होते. यावेळी अधिक्षक ओमकार चव्हाण यांनी रानभाज्या आपल्या ठराविक काळात जंगलात उपलब्ध होत असतात. त्या भाज्या या आपल्या आहाराच्या दृष्टीने महत्वाच्या असतात आणि त्यामुळे त्या भाज्या त्या त्या हंगामात आपण खाव्या आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यास फायदा करून घ्यावा असे आवाहन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले. शासकीय आश्रमशाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रानभाज्या महोत्सवात माठ, शेवळा, अळू, तेरा, टाकळा, कुर्डू, शेवगा, लोथ, खरशिंग, डीना, डिन्याची फुले, कुड्याची शेंग, गिदवड वेल, भवरी वेल, कैला, रानतीळ आदी रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. तर विविध प्रकारचे मासे प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात भुरबूट, वरडोळ्या, तेलापा, मळ्याचा मासा, खुबी, खेकडा यांचा समावेश होता.
रानभाज्यांचे महत्त्व
रानात, माळरानावर, शेताच्या बांधावर किंवा जंगलाच्या कडेला निसर्गतः उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. शेती, सिंचन किंवा निगा न करता निसर्ग स्वतःच ज्या वनस्पती पिकवतो त्या रानभाज्या पोषणदृष्ट्या अतिशय समृद्ध असतात. या भाज्यांमध्ये खनिजे, आवश्यक मूलद्रव्ये आणि औषधी गुणधर्म प्रचुर प्रमाणात आढळत असल्यामुळे शरीरासाठी हितकारक ठरतात.







