बेकायदेशीर शिक्षक प्रतिनियुक्ती उघड
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील दोन प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षकांची त्यांच्या शाळेतून उचल करून थेट मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी व स्वीय सहायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नियमबाह्य झालेल्या या प्रतिनियुक्तीबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाड तालुक्यातील राजिप केंद्रीय शाळा, कांबळे/बिरवाडी येथील सहाय्यक शिक्षक डॉ. महेंद्र गुणाजी शिर्के यांची 16 डिसेंबर 2024 रोजी थेट गोगावले यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तर महाड पंचायत समिती अंतर्गत असलेले शिक्षक भिकाजी परशुराम मंधारे यांचा उपयोग करण्यासाठी गोगावले यांनी 20 जानेवारी 2025 रोजी ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे यांना पत्र लिहून त्यांचे आदेश काढण्याची विनंती करून त्यांचीही नियुक्ती स्वतःच्या कार्यालयात स्वीय सहायक म्हणून केली आहे.
मात्र, ग्रामीण विकास विभागाच्या नियमावलीनुसार शिक्षकांना मंत्री कार्यालयात नेमण्यास परवानगी नसल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे या नियुक्तीवर या विभागाने आक्षेप नोंदवला आहे. तरीदेखील गोगावले यांनी शिफारस केल्याने प्रतिनियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे समोर आले. या नियुक्तीवरून शिक्षण क्षेत्रात वाद निर्माण झाला असून, शिक्षकांचा शैक्षणिक कामाऐवजी राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक व प्रशासकीय कामांसाठी वापर का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या वादग्रस्त नियुक्तीवर स्पष्टीकरण देताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसारच अधिकारी व कर्मचारी नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.’
अलिबागमधील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी 2023 मध्ये डॉ. महेंद्र गुणाजी शिर्के हे महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील नियमित प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, डिसेंबर 2022 रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मागणीवरून त्यांची प्रतिनियुक्ती मंत्री कार्यालयात करण्यात आली होती. ही बाब उघड झाली होती. सावंत यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, प्राथमिक शिक्षकांचा गैर-शैक्षणिक कामांसाठी वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणून चौकशीची मागणी केली होती. परंतु, चौकशी सोडाच पुन्हा त्याच शिक्षकाची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीबाबत सध्या मला माहिती नाही. मी माहिती घेवून सांगते. त्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील अशी प्रतिक्रीया राजिपच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी दहितुले यांनी दिली आहे.







