निवडणुकीत पारदर्शकता राखण्याची मागणी
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने मतदार याद्या जाहीर करून हरकती घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे राजकीय नेत्यांकडून सांगितले जात आहे.
कोप्रोली गावातील ग्रामपंचायत मतदार यादीत तालुक्यातील इतर गावांचे मतदार समाविष्ट झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, खोपटे ग्रामपंचायतमधील 37 मतदार हे गावात वास्तव्य नसतानाही कोप्रोली यादीत समाविष्ट आहेत, असे ग्रामपंचायत सदस्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, उरण विधानसभा मतदारसंघातही अनेक परप्रांतीय मतदार उरणमध्ये वास्तव्यास आहेत; परंतु, त्यांची नावे त्यांच्या मूळ गावाच्या यादीतही आहेत. त्यांची दोन्ही ठिकाणी नावे असल्यामुळे मतदारांना अनुचित फायदा मिळत आहे, असा आरोप स्थानिक राजकीय नेत्यांकडून करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांची मागणी आहे की, निवडणूक आयोगाने परप्रांतीय मतदारांची सखोल चौकशी करून त्यांची नावे योग्य मतदार संघात ठेवावी, जेणेकरून निवडणुकीत पारदर्शकता राखली जाईल. ग्रामपंचायतीने देखील याबाबत हरकत नोंदवली आहे. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई किंवा नाव कमी करण्याची पावले उचलली जात नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून केला जात आहे.







