चक्रीवादळाने विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा खंडित
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात गुरुवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळासह मुसळधार पाऊस आला. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. मात्र, सर्वाधिक नुकसान विजेचे खांब कोसळून झाले. तालुक्यात कडाव परिसरात मोठ्या विजेचे खांब कोसळल्याने संपूर्ण कर्जत तालुका अंधारात गेला. सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्रीपर्यंत कर्जत शहर वगळता अन्य सर्व भागातील वीज पुरवठा खंडित झाला.
वेधशाळेने जाहीर केल्याप्रमाणे दि. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता 15 ऑक्टोबर रोजी काही प्रमाणात खरी ठरली होती. गुरुवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला होता. मात्र, कर्जत तालुक्याच्या कशेळे, कडाव, खांडस या भागाला पावसाने अक्षरशः झोडपले. सायंकाळी 5 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस आणि कडाव परिसरात चक्रीवादळसारखी परिस्थिती निर्माण झाली. या वादळाने कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे काढणीला आलेले भाताच्या शेतीचे मोठे नुकसान केले आहे. मात्र, कडाव परिसरात आलेल्या वादळाने तेथील कळंबोली उप केंद्रातून तालुक्याच्या सर्व भागात जाणारा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. त्या भागात असंख्य विजेच्या खांबांवर झाडे कोसळली. त्यामुळे अनेक विजेचे खांब जमिनीवर पडले. त्यामुळे कळंबोली येथील वीज उपकेंद्रातून तालुक्याच्या सर्व भागात जाणारा वीज पुरवठा खंडित झाला.
कळंबोली येथील उप केंद्रातून कर्जत शहर, नेरळ, माथेरान, कळंब, कशेळे या उपकेंद्रला वीज पुरवली जाते. त्यात कर्जत शहराला खोपोलीकडून देखील वीज पुरवठा होत असतो. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने महावितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान केले आहे. असंख्य झाडे विजेच्या तारांवर कोसळली असल्याने वीज पुरवठा बंद झाला. कर्जत शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला असून, तालुक्याच्या अन्य काही भागात 5 वाजल्यापासून वीज नव्हती. महावितरणचे कार्यकारी अभियंता शिंदे तसेच उप अभियंता चंद्रकांत केंद्रे आणि तालुक्यातील सर्व सहायक अभियंता यांच्याकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत असल्याची माहिती महावितरणकडून रात्री 8 वाजता देण्यात आली होती.






