नेरळमधील टपरीधारकांकडून होतोय आरोप
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेने व्यापारी संकुलामधील 104 गाळ्यांचे वाटप करण्यासाठी ई-निविदा काढली आहे. ही निविदा काढताना एक-एक गाळा वाटप करण्यात येईल, अशी निविदा काढलेली नाही, तर एकावेळी 104 गाळ्यांचे वाटप ठेकेदाराला केले जाणार आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदार हा भाडेतत्वावर गाळे देणार आहे. एक-एक गाळा घेता येणार नसल्याने व्यापारी संकुलातील गाळे ठेकेदाराच्या घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नेरळमधील मूळचे टपरीधारक यांच्याकडून केला जात आहे.
मागील महिन्यात रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी नेरळ गावातील व्यापारी संकुलाची पाहणी केली होती. त्यानंतर लगेच त्या संकुलातील गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक वर्षे जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने हा धोरणात्मक निर्णय त्या त्या काळातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला नव्हता. तर मग आजही रायगड जिल्हा परिषदेत सदस्य मंडळ अस्तित्वात नसतानादेखील नेरळ व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे. हे कोणत्या नियमाला धरून असल्याचा प्रश्न व्यापारी संकुलात गाळा मिळेल या आशेवर असलेली टपरीधारकांना पडला आहे. पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा धोरणात्मक निर्णय सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यावर घेईल असे सांगत असताना, सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी हा निर्णय घेतल्याने टपरीधारक नाराज आहेत. एवढे वर्षे आम्हाला टपरीऐवजी गाळे देण्याचे दिलेले आश्वासन ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद का पाळत नाहीत? असा प्रश्न टपरी धारक उपस्थित करीत आहेत.
नेरळ संकुल प्राधिकरणाने नेरळ बाजारपेठेत व्यापारी संकुल बांधले आहे. या संकुलाचे बांधकाम 2022 मध्ये पूर्ण झाले असून, मागील तीन वर्षे संकुल बंद आहे. रायगड जिल्हा परिषदेत सदस्य मंडळ नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संकुलातील गाळ्यांचे वाटप केले जात नव्हते. साधारण अडीच कोटी खर्चून बांधलेले या संकुलातील गाळ्यांचे वाटप नेरळ बाजारपेठेमधील रस्ता रुंदीकरण करताना रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या टपरीधारक यांना देण्यात येणार होते. रस्त्यावरील टपऱ्या तोडण्यात आल्यानंतर नेरळ गावातील रस्ते तयार करण्यात आले. मात्र, त्यामुळे नेरळ गावातील बाजारपेठेमधील वाहतूक कोंडी टपरीधारकांकडून फूटपाथ अडवल्याने आजही कायम आहे. बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलात अद्यापपर्यंत टपरीधारकांना गाळे देण्यात आले नाहीत. गाळे मिळावे यासाठी अनेक वेळा टपरीधारक नेरळ ग्रामपंचायत आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आले आहेत. त्या त्या वेळी सदस्य मंडळ नसल्याने व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वितरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही, असे सांगितले जात होते.
दोन वर्षे वितरण प्रक्रिया का नाही?
व्यापारी संकुलातील आता गाळ्यांचे होणारी प्रक्रिया ही आणखी काही महिने थांबवावी. दोन महिन्यांत जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असताना व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी नेरळमधील टपरीधारक करीत आहेत.







