| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील मोटार वाहन विभागातील (आरटीओ) कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून, सर्व रिक्त पदांवर तातडीने पदोन्नती करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
मागील तीन वर्षांपासून कर्मचारी संघटना संयमाने लढा देत आहे, परंतु परिवहन विभागाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यांनी सांगितले की, विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, “परिवहन विभागाला आमच्या मागण्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे आता आम्ही आठवण करून देण्यासाठी उपोषणाला बसत आहोत.” या उपोषणामुळे राज्यातील आरटीओ कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







