भातपिके गेली चिखल मातीत
| चिरनेर | प्रतिनिधी |
गेले काही दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण उरण तालुक्यासह चिरनेर पूर्व विभागात धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसला आहे. या धुवाधार पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपीक पाण्याखाली गेले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे तयार झालेल्या भात पिकांची चिखल माती झाल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
उरण तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. उरणच्या पश्चिम भागात औद्योगिकरणामुळे भात शेती नामशेष झाली असली तरी उरणच्या पूर्व भागात आजही शेकडो एकर शेतात शेतकरी भाताचे पीक घेत आहेत. वाढती महागाई तसेच मजुरांचे दर वाढल्याने भातशेती सध्या फायद्याची राहिली नाही. तरीही आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शेतकरी भातपीक घेत आहेत. यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे भातशेती जोमदार झाली होती. त्यात भाताचे पीकसुद्धा चांगले आले होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या धुवाधार परतीच्या पावसामुळे जोमदार पीक शेतात साचलेल्या पाण्याखाली बुडाले आहे. बुडालेले पीक कुजून त्याची चिखल माती झाल्याचे चित्र शेकडो एकर भात शेतीमध्ये दिसून येत आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला असून, तो शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून पाऊस दुपारी किंवा सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह सुरू होतो. मात्र परिस्थिती कशीही असली तरी शेतकऱ्यांना शेतीची कामे ही वेळेतच पूर्ण करावी लागतात. कारण या पुढे शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणी करायची आहे. कापणी, बांधणी, झोडणीचे कामे ही हंगामातच करावी लागतात. भात खाचरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे पिके ही आडवी होऊन भाताच्या लोंब्या चिखलात सापडल्या आहेत. तसेच कापून ठेवलेली भात पिके भिजून पार कुजून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतीचे नुकसान पाहता राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. परंतु, केवायसी, फार्मर आयडी या नियम, अटी, निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल याची खात्री वाटत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
प्रमोद पाटील,
शेतकरी, चिरनेर
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यानंतर शासकीय निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.
सुषमा गायकवाड,
कृषी सहाय्यक अधिकारी





