| खरोशी | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील भाल तुकारामवाडी परिसरात चार पाच विद्युत पोल पडल्याने ऐन दिवाळीत गाव अंधारात होता. त्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विजय मंडळ कार्यालयावर धडक दिली असता, तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी सदरचे विद्युत पोल उभारण्याचे आदेश देत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पेण तालुक्यात परतीचा पाऊस वादळ वाऱ्यासह पडत असल्याने यामध्ये वढाव खारेपाट भागातील जीर्ण झालेले विद्युत पोल वादळ वाऱ्यासह पावसाने पडल्याने भाल तुकारामवाडी गाव पूर्णतः ऐन दिवाळीत चार-पाच दिवस अंधारात होते. याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तात्काळ वीज मंडळ कार्यालय येथे ग्रामस्थांसह जाऊन याबाबतची विचारणा केली. दरम्यान, या परिसरातील पडलेले विद्युत पोल तात्काळ उभे करून लाईट सुरू करावी, अशी मागणी केली असता यावर महावितरणचे कार्यकारी अभियंता उमेश चव्हाण यांनी संबंधित कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून विद्युत पोल उभे करण्याचे सांगत तात्काळ लाईट सुरु करण्याचे आदेश दिल्याने उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी समीर म्हात्रे यांचे आभार मानले.







