ओला दुष्काळ जाहीर करा : म्हात्रे
| खरोशी | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील वाशी खारेपाटातील भातशेती 100 टक्के उद्ध्वस्त झाली आहे. वाशी शिर्की विभाग, हमरापूर विभाग, किनारपट्टी उद्ध्वस्त झाली आहे. परतीच्या सायंकाळच्या या जोरदार वादळी पावसाने शेती कायमचीच झोपून गेली आहे. पाणीमय झाली आहे. कापलेली शेती, बांधून ठेवलेले भारे कुजले असून, कणसे मोड येऊन हिरवी झाली आहेत. त्यामुळे बळीराजा हतबल झाला. दरम्यान, वाशी खारेपाटाला ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खारेपाटातील सामाजिक कार्यकर्ते सी.आर. म्हात्रे यांनी केली आहे.
खारेपाटामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण पोटापुरते भातसुद्धा शेतीत राहिले नाही, मग वर्षभर खाणार काय? महागडे बियाणे, खते, जंतुनाशके, भरमसाठ मजुरी यावर मात करून बहरून आलेली शेती संपली. जणू आभाळ फाटलं आणि शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असून, तो हतबल झाला आहे. शेतीतील पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग कांदळवनाने गिळंकृत केले असून, खाड्या, शेवटच्या घटका मोजत आहेत. दलदल, सुपिकता हरवली असून, आत्ता पुढच्या हंगामाला तोंड देण्याची हिंमत बळीराजात नाही. म्हणूनच खारेपाट विभागाला विशेष पॅकेज हवे, तात्काळ पुनर्वसन पॅकेज द्या, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. निसर्गाच्या लाटांना थोपविता येत नाही,पण अन्याय आणि निष्क्रियतेला नक्कीच तोंड देता येते.मात्र येथेही जनतेच्या मानसिकतेची गरज आहे. परतीच्या पावसाने शेती वाहून गेली बळीराजा पुन्हा उभा राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजे.अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते सी आर म्हात्रे यांनी केली आहे.







