| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
महिलेला मानसिक त्रास देऊन पैशांकरिता तिच्या मागे तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुजरातमधील रहिवाशी रवी हरेशभाई भडका यांच्या विरोधात 31 ऑक्टोबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अनघा पाटील यांची शेअर मार्केट ट्रेडिंग ऑनलाईन कोर्समध्ये रवी भडका यांच्याशी ओळख झाली. त्यानुसार त्यांनी त्यात पैसे गुंतवले. रवी भडका याने परतावा म्हणून काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात परत केले. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा येत नसल्याने अनघा व तिचा पती हे रवी भडका याला वारंवार संपर्क करून परतावा परत देण्याबाबत विचारणा करत होते. मात्र, तो वारंवार वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत होता. रवी भडका हा परतावा देत नसताना सुद्धा अनघाला मानसिक त्रास देऊन तिच्याकडून आणखी रक्कम घेत होता. या मानसिक त्रासातून अनघा यांनी 8 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रवी हरेशभाई भडका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.







